पावसाळ्याची अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाट परिसरात निसर्गाचा रौद्र अवतार पाहायला मिळाला. गुरुवारी दुपारी निपाणीजवळील तवंदी घाटात अवघ्या काही वेळात झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. त्यामुळे काही काळासाठी हा रस्ता अक्षरशः नदीसारखा दिसू लागला.

वादळी वाऱ्यासह झालेल्या या अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगर उतारावरून चिखल, दगड आणि बांधकाम साहित्य रस्त्यावर आले. परिणामी वाहनांच्या हालचालींवर परिणाम झाला आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेत एका बाजूची वाहतूक बंद करून दुसऱ्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवली.

सलग दुसऱ्या दिवशी या भागात पावसामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनांना पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र दिसून आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, तवंदी घाटातील पावसाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मान्सूनपूर्व पावसानेच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांत प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरात दुपारनंतर काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि वाहनचालकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.